जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित करणाऱ्या आरोपीला जळगाव सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांच्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासात आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याविरुद्ध लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियाचा गैरवापर करून बदनामी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी १९ जून २०२६ रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार, “भारत बालाजी म्हस्के” या नावाने चालविण्यात येणाऱ्या फेसबुक खात्यावरून मंत्री गिरीश महाजन यांच्या एका मुलीसोबतचा फोटो वापरून आक्षेपार्ह स्वरूपाची पोस्ट प्रसारित करण्यात आली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५६(३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क) आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि सायबर पोलिसांच्या विशेष पथकाने जवळपास महिनाभर तांत्रिक तपास, डिजिटल विश्लेषण आणि विविध इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण तपासामुळे आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात अखेर यश आले.
तपासादरम्यान भरत बालाजी म्हस्के (वय ३४, रा. इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित पोस्ट केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे ३० हजार रुपये किमतीचा ओप्पो रेनो १५ फाइव्ह जी मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीस संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार नोटीस बजावली असून तपास अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम पूर्ण होत असून आरोपीविरुद्ध लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, आरोपीने प्रसिद्ध केलेली आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून हटविण्यात आली असून सुमारे सहा हजार फॉलोअर्स असलेले संबंधित फेसबुक खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे.
या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर तसेच जळगाव सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण तपास पथकाचे कौतुक होत आहे. नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या तक्रारीची तत्पर दखल घेत आरोपीला अटक करण्यात यश आल्याने सायबर गुन्ह्यांच्या तपासात जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.



