रायपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वेळेवर उपलब्धता होऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जळगाव तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सौजन्याने शालेय वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
शनिवार, दि. १८ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वितरण करण्यात आले. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व अधिक असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान कोळी, उपाध्यक्ष अनिल परदेशी, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रवीण परदेशी, मुख्याध्यापिका चित्रलेखा वायकोळे, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच गावातील विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेण्याचे, अभ्यासात सातत्य राखण्याचे आणि उपलब्ध सुविधांचा योग्य लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि समाजातील विविध घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.



