Home Cities जळगाव महामार्गावरील पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीच्या कामाला सुरुवात

महामार्गावरील पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीच्या कामाला सुरुवात

0
12

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत पावसाळ्यात पाणी साचून वाहनधारकांना आणि नागरिकांना होणाऱ्या मोठ्या त्रासावर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खा. स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, अग्रवाल हॉस्पिटल चौफुली ते शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) परिसरापर्यंत गटारीच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरुवात केली आहे.

जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अखत्यारीत येणाऱ्या या मार्गावर प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. त्यामुळे वाहनधारक, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांना वाहतुकीदरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी वारंवार लक्ष वेधल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अखेर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला आहे. या कामाअंतर्गत अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीपासून शासकीय तंत्रनिकेतनपर्यंत खड्डे खोदून नवीन गटार उभारण्यात येत आहे. या गटारीमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचण्याऐवजी थेट निचऱ्याच्या व्यवस्थेतून वाहून जाणार असल्याने वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी महापौर दीपमाला काळे यांनी या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राहुल पाटील, आशिष कासट तसेच कंत्राटदार कृष्णा मुरारी मिश्रा उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाच्या स्वरूपाची आणि नियोजनाची सविस्तर माहिती महापौरांना दिली. पाहणीदरम्यान महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला काम दर्जेदार पद्धतीने व निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कामात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये तसेच गुणवत्तेशी तडजोड न करता काम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.


Protected Content

Play sound