Home Cities जळगाव प्रकाशमय होणार जळगाव विमानतळ मार्ग; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुढाकार यशस्वी

प्रकाशमय होणार जळगाव विमानतळ मार्ग; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुढाकार यशस्वी

0
17

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या विमानतळ मार्गाच्या आधुनिकीकरणाला वेग आला असून, अजिंठा चौफुल्ली ते चिंचोली विमानतळ परिसरापर्यंत अत्याधुनिक विद्युत प्रकाशयोजना उभारण्यासाठी ५ कोटी ५ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला असून, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

जळगाव विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, अजिंठा चौफुल्ली ते विमानतळ परिसरादरम्यान रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत या मार्गावर कायमस्वरूपी आणि अत्याधुनिक विद्युत प्रकाशयोजना उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर ७ जुलै २०२६ रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांची सुरक्षितता, शहराचा वाढता विस्तार आणि विमानतळाशी जोडणाऱ्या मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

या विकासकामासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा विषय समितीसमोर मांडला होता. त्यांच्या मागणीला बैठकीत उपस्थित सर्व आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ आणि उपस्थित अन्य लोकप्रतिनिधींनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला.

समितीच्या मंजुरीनंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि १५ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ५ कोटी ५ लाख रुपयांच्या या कामास प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रकाशयोजना पूर्ण झाल्यानंतर विमानतळाकडे जाणारा मार्ग अधिक सुरक्षित, प्रकाशमय आणि आकर्षक होणार आहे. यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास अधिक सुलभ होईल, तसेच जळगाव शहराच्या प्रवेशद्वाराची ओळख अधिक आधुनिक आणि सुशोभित होण्यास मदत मिळणार आहे. वाढत्या हवाई संपर्काला पूरक अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला जात असून, लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे महत्त्वाचे विकास प्रकल्प जलद गतीने मार्गी लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound