Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवले आई-बाळाचे प्राण

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवले आई-बाळाचे प्राण

0
16

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हृदयविकाराने त्रस्त असलेल्या आणि यापूर्वी हृदयावर शस्त्रक्रिया झालेल्या २४ वर्षीय गर्भवती महिलेची अत्यंत जोखमीची प्रसूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पार पाडत आई आणि नवजात बाळाचे प्राण वाचवले आहेत. विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समन्वय, अचूक नियोजन आणि वेळेवर केलेल्या उपचारांमुळे ही गुंतागुंतीची प्रसूती यशस्वी ठरली.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, कल्पना (बदललेले नाव) या २४ वर्षीय महिलेवर यापूर्वी गंभीर हृदयविकारामुळे हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा परिस्थितीत गर्भधारणा आणि प्रसूती ही वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत उच्च जोखमीची मानली जाते. गर्भधारणेदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्याने संपूर्ण कालावधीत विशेष वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता होती.

दरम्यान, गर्भवती महिलेला हृदयाचा त्रास, पाठीचे दुखणे आणि पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्याने तिला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी महिलेची सखोल तपासणी केली. त्यानंतर मेडिसीन विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मत घेऊन हृदयाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले.

महिलेची पूर्वीची हृदय शस्त्रक्रिया आणि सध्याची प्रकृती लक्षात घेता प्रसूतीदरम्यान आईच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मेडिसीन विभाग, भूलशास्त्र विभाग आणि स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी संयुक्तपणे प्रसूतीचे नियोजन केले. डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. साक्षी आणि भूलतज्ज्ञ डॉ. सतीश यांच्या नेतृत्वाखालील टीमने प्रत्येक टप्प्यावर अत्यंत दक्षतेने उपचार केले.

प्रसूतीपूर्व आवश्यक तपासण्या, आई आणि गर्भाच्या आरोग्याचे सातत्यपूर्ण निरीक्षण तसेच प्रशिक्षित परिचारिकांच्या सहकार्याने संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वित प्रयत्नांमुळे अत्यंत जोखमीची प्रसूती यशस्वी झाली आणि आईसह नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

या यशस्वी उपचारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टरांनी दाखविलेली तत्परता, अचूक निर्णयक्षमता आणि योग्य उपचारांमुळे आई व बाळाला नवजीवन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. प्राजक्ता पाटील यांनी सांगितले की, हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांमध्ये गर्भधारणा आणि प्रसूती ही नेहमीच उच्च जोखमीची असते. अशा रुग्णांमध्ये प्रसूतीदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्याने मेडिसीन तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि वेळेवर उपचार यामुळे ही प्रसूती यशस्वीपणे पूर्ण झाली. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती चांगली असून आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


Protected Content

Play sound