जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील जनरल अरुण वैद्य चौक अर्थात आकाशवाणी चौक येथे भारतीय सैन्याचा सेवामुक्त रणगाडा उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या मागणीसंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकसहभागातून निधी उभारून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत रणगाडा उभारण्यासाठी पुढाकार घेऊ, असा इशाराही मनसेने दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, भारतीय सैन्याचे माजी प्रमुख जनरल अरुण वैद्य हे देशाच्या संरक्षणासाठी धैर्य, नेतृत्व आणि पराक्रमाचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाने चौकाचे नामकरण करून केवळ फलक लावणे पुरेसे नाही, तर त्या नावाला साजेशे प्रेरणादायी स्मारक उभारणे आवश्यक आहे. चौकात भारतीय सैन्याचा सेवामुक्त रणगाडा उभारल्यास तो देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञतेचे प्रतीक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या चौकाचे नामकरण झाल्यानंतर येथे दोन्ही बाजूंना दोन लहान तोफा बसविण्यात आल्या होत्या. त्या तोफा नागरिकांसाठी भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करून देत होत्या. मात्र, त्या आता तेथे नसल्याने चौकाची ओळख आणि प्रेरणादायी स्वरूप कमी झाले आहे. त्यामुळे चौकाला पुन्हा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अभिमानाचे स्वरूप मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. देशातील अनेक शहरांमध्ये सेवामुक्त रणगाडे, तोफा, लढाऊ विमाने आणि अन्य लष्करी साहित्य सार्वजनिक ठिकाणी उभारून देशभक्तीची भावना जागृत ठेवली जाते. जळगावसारख्या ऐतिहासिक आणि वेगाने विकसित होत असलेल्या शहरातही अशा प्रकारचे स्मारक उभारल्यास नागरिकांसह तरुण पिढीला भारतीय सैन्याच्या शौर्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मनसेने व्यक्त केला.
मनसेने महापालिका प्रशासनाला संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्याशी समन्वय साधून सेवामुक्त रणगाडा उपलब्ध करून घेण्याची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक निधी किंवा इतर प्रशासकीय अडचणी असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसहभागातून निधी उभारेल आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जळगावमध्ये रणगाडा आणण्यासाठी पुढाकार घेईल, अशी ठाम भूमिका ॲड. जमील देशपांडे यांनी मांडली. “शहरातील चौक हे केवळ वाहतुकीचे केंद्र नसून शहराचा इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमान जपणारी जिवंत स्मारके असतात. जनरल अरुण वैद्य यांच्या नावाच्या चौकात रणगाडा उभारणे म्हणजे जळगावच्या भूमीकडून भारतीय सैन्याला वाहिलेली अभिमानाची मानवंदना ठरेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनसेतर्फे असेही नमूद करण्यात आले की, रणगाडा हा केवळ लोखंडाचा ढीग नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्ररक्षणाच्या अखंड संकल्पाचा जिवंत इतिहास आहे. शौर्याचा सन्मान करणारे शहरच पुढील पिढीमध्ये खरी देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना रुजवू शकते. या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार तसेच शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



