Home प्रशासन वंदना जैन यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती

वंदना जैन यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती

0
25

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर वंदना पूनमचंद जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे मुक्ताईनगरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक, व्यापारी आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या तक्रारींचे निवारण, बालकल्याणाशी संबंधित धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या पदावर वंदना जैन यांची नियुक्ती होणे ही मुक्ताईनगरसाठी गौरवास्पद बाब मानली जात आहे. वंदना पूनमचंद जैन या स्वर्गीय पूनमचंद मोतीलाल जैन (बोथरा), माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या सुकन्या आहेत. तसेच मुक्ताईनगरमधील प्रसिद्ध व्यापारी व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पूजा साडी सेंटर, पूजा ड्रेसेस, पूजा किराणा आणि पूजा ग्रोसरी मार्टचे संचालक शांतिलाल सेठ बोथरा, प्रतापसेठ बोथरा, संजय सेठ बोथरा आणि शेखर सेठ बोथरा यांच्या त्या प्रेमळ पुतणी आहेत. त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मोठा वारसा असून, या नियुक्तीमुळे त्या परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

बालहक्क संरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात सचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांच्या प्रशासकीय क्षमता, कार्यअनुभव आणि नेतृत्वगुणांवर शासनाने दाखविलेला विश्वास अधोरेखित झाला आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यभरातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विकासासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच बालसुरक्षेशी संबंधित उपक्रमांना निश्चितच होईल, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या नियुक्तीचे वृत्त समोर येताच मुक्ताईनगर तालुक्यातील सामाजिक, व्यापारी, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. अनेकांनी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत राज्यातील बालहक्क संरक्षणाच्या कार्यात त्या प्रभावी योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.


Protected Content

Play sound