Home क्राईम केवळ एका अस्पष्ट फोटोच्या आधारे थरारक कारवाई : रावेर पोलिसांकडून अमरावतीतील मुख्य...

केवळ एका अस्पष्ट फोटोच्या आधारे थरारक कारवाई : रावेर पोलिसांकडून अमरावतीतील मुख्य मारेकरी जेरबंद !

0
3

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे एका ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रकला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असताना, रावेर पोलिसांनी केवळ एक अस्पष्ट फोटोच्या आधारे अतिशय शिताफीने त्याला जेरबंद केले आहे. मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय ४८, रा. महमद, गाव मंध्रवाला, ता. अजनाडा, जि. अमृतसर, पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

केबिनमध्ये आढळला होता जळालेला मृतदेह

अमरावती ग्रामीण मधील मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये चालकाचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृत्यूचे खरे कारण लपवणे आणि हत्येचा पुरावा नष्ट करणे या उद्देशानेच ट्रकला आग लावण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. तपासादरम्यान आरोपी हा गुन्हा करून पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असून तो जळगाव जिल्ह्यातील रावेर रेल्वे स्टेशन परिसरात लपला असल्याची माहिती समोर आली.

अमरावती अन् जळगाव पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

आज सकाळी ८:४८ वाजता अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी (SP) जळगावच्या पोलीस अधीक्षकांशी थेट संपर्क साधून आरोपी रावेर परिसरात असल्याची गुप्त माहिती दिली. जळगाव एसपींच्या सूचनेवरून रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ सूत्रे हलवून रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम सुरू केली.

केवळ ‘एक अस्पष्ट फोटो’ आणि आरोपी जेरबंद!

रावेर पोलिसांकडे कारवाई करताना आरोपीचा केवळ एक अस्पष्ट फोटो उपलब्ध होता. कोणतीही ठोस ओळख नसतानाही पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि वेगाने शोध घेत संशयित आरोपी मनप्रीतसिंह रंधावा याला रावेरमधून आत्ताच ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची आयशर गाडी (क्रमांक- PB-02-EW-4299) देखील हस्तगत करण्यात आली आहे.

पैशांच्या वादातून गळा दाबून खून

रावेर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे. आर्थिक (पैशांच्या) कारणातून त्याने मृत ट्रक चालकाचा आधी गळा दाबून खून केला आणि नंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहासह ट्रकला आग लावून दिली. सध्या आरोपी रावेर पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला अधिकृतरीत्या ताब्यात घेण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचे एक विशेष पथक जळगावकडे रवाना झाले आहे. रावेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी बजावल्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound