Home Cities पारोळा पारोळ्यात आदर्श शिक्षक सदानंद भावसार यांच्याकडून डाई मेकर नीता जडे यांचा सत्कार 

पारोळ्यात आदर्श शिक्षक सदानंद भावसार यांच्याकडून डाई मेकर नीता जडे यांचा सत्कार 

0
16

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हस्तकलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाऱ्या पारोळा येथील डाई मेकर नीता प्रवीण जडे यांचा आदर्श निवृत्त शिक्षक तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भावपूर्ण सत्कार केला. नीता जडे यांच्या कलाकौशल्याचा गौरव करत भावसार सरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हस्तकलेतील अत्यंत किचकट आणि कौशल्यपूर्ण मानल्या जाणाऱ्या चार कला प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवल्याबद्दल नीता जडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची बातमी वृत्तपत्रातून वाचल्यानंतर आपल्याला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटल्याचे सदानंद भावसार यांनी सांगितले. या आनंदाच्या प्रसंगी भावसार सरांनी नीता जडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ (बुके) आणि अभिनंदन पत्र देऊन सत्कार केला. तसेच भविष्यात त्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळावा, यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

यावेळी नीता जडे यांच्या मातोश्री ज्योतीबाई, सुपुत्र अक्षय आणि ऋषीकेश यांनी भावसार सरांनी दिलेल्या सन्मानाबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले. समाजातील गुणवंत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या भावसार सरांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. सदानंद धडू भावसार यांनी आजपर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तब्बल १०४ गुणवंत व्यक्तींचा सत्कार केला आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ध्येय साध्य करणारे युवक-युवती, बँक, पोस्ट, शिक्षण, महसूल, आरोग्य यांसह विविध शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्यांनी गौरव केला आहे. गुणवंत व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या भावसार सरांच्या या सामाजिक उपक्रमाचे पारोळा शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून, त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत धन्यवाद दिले आहेत.


Protected Content

Play sound