Home उद्योग  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीनंतर ११ महिन्यांनी चौकशी अहवाल ; कारणे दाखवा...

 आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीनंतर ११ महिन्यांनी चौकशी अहवाल ; कारणे दाखवा नोटीस बजावल्याची चर्चा

0
16

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर महावितरण विभागातील ब्रेकडाऊन मेंटेनन्स कामांमध्ये कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये केलेल्या तक्रारीची चौकशी तब्बल ११ महिन्यांनंतर अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी अहवाल कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर संबंधित ठेकेदार आणि काही सहाय्यक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची चर्चा महावितरण वर्तुळात सुरू आहे. मात्र, या संदर्भात महावितरणकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, उपअभियंता शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी पूर्ण करून अहवाल कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केला आहे. या अहवालात माऊली इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार संस्थेमार्फत करण्यात आलेल्या काही कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याची तसेच संबंधित कामांशी निगडित काही सहाय्यक अभियंत्यांच्या भूमिकेबाबत निरीक्षणे नोंदविण्यात आल्याची चर्चा विभागात आहे. या दाव्यांची अधिकृतपणे पुष्टी अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांनी संबंधित ठेकेदार उमेश बंबाटकर तसेच संबंधित सहाय्यक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तथापि, या संभाव्य कारवाईबाबत महावितरण प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

ब्रेकडाऊन मेंटेनन्स अंतर्गत जीर्ण वीजतारा बदलणे, वाकलेले वीज खांब दुरुस्त करणे, एबी स्विच, ट्रान्सफॉर्मर केबल आणि डिस्ट्रीब्युशन बॉक्सची अदलाबदल करून सुरक्षित आणि अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणे अपेक्षित असते. मात्र, या कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने बिले काढण्यात आल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला होता. याच विषयाशी संबंधित आणखी एक तक्रार आमदार चंद्रकांत पाटील यांनी मार्च २०२६ मध्ये केली होती. त्यामध्ये कुऱ्हा आणि वडोदा विभागांतील ब्रेकडाऊन मेंटेनन्स अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सहा महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही या तक्रारीवरील चौकशी पूर्ण न झाल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

तक्रारीनुसार, कुऱ्हा आणि वडोदा विभागात सुमारे १.२० कोटी रुपयांच्या ब्रेकडाऊन मेंटेनन्स कामांमध्ये नियमबाह्य प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वडोदा विभागात सहाय्यक अभियंता मनोरे यांनी तपास करून सुमारे ५० लाख रुपयांची बिले रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे कुऱ्हा विभागात संबंधित कामांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याने या प्रकरणाबाबत संशय अधिक गडद झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२५ मधील तक्रारीवरील चौकशी अहवालानंतर पुढे कोणती प्रशासकीय कारवाई केली जाते आणि मार्च २०२६ मधील तक्रारीची चौकशी कधी पूर्ण होणार, याकडे शेतकरी, वीज ग्राहक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. दोषींवर ठोस कारवाई होईल का, याबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपांवर संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.


Protected Content

Play sound