Home करियर रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचा पदग्रहण सोहळा उत्साहात 

रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचा पदग्रहण सोहळा उत्साहात 

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मायादेवीनगर येथील रोटरी भवनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मावळते अध्यक्ष संदीप झवर यांनी नूतन अध्यक्ष संजय तापडिया यांच्याकडे, तर मावळते सचिव हरगोविंद मणियार यांनी नूतन सचिव धर्मेंद्र भय्या यांच्याकडे पदभार सोपविला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात आगामी वर्षासाठीच्या सेवा उपक्रमांची दिशा स्पष्ट करण्यात आली.

या पदग्रहण सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे माजी गव्हर्नर डॉ. दीपक शिकारपूर आणि असिस्टंट गव्हर्नर अनिल कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित सदस्य, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या साक्षीने नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दीपक शिकारपूर यांनी जळगावमध्ये माहिती तंत्रज्ञानासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रासाठीही पोषक वातावरण असल्याचे सांगितले. जळगावातून शिक्षण घेऊन देश-विदेशात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक आणि प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या शहरासाठी योगदान देत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. रोटरीच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील गरजू, वंचित आणि अपेक्षित घटकांसाठी सेवाभाव व समर्पणाच्या भावनेने कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सकारात्मक विचारसरणीच्या आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना रोटरीच्या प्रवाहात सहभागी करून रोटरी चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नूतन अध्यक्ष संजय तापडिया यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षभरात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तीकरण आणि सामाजिक विकासाशी संबंधित विविध उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने समाजोपयोगी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. याशिवाय वर्षभरात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सेवा, आरोग्य, शैक्षणिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

असिस्टंट गव्हर्नर अनिल कांकरिया यांनीही मनोगत व्यक्त करत रोटरी क्लबच्या नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि सेवा कार्यात सातत्य व गुणवत्ता राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैजयंती पाध्ये यांनी केले, तर डॉ. प्रशांत वारके यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound