जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची आज निवड करण्यात आली.
अजबसिंग पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर नेमकी कुणाची वर्णी लागणार ? याबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले होते. या अनुषंगाने आज ग.स. सोसायटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात सहकार व लोकसहकार गटाने एकत्र येत अध्यक्षपदासाठी रागिणी चव्हाण यांना तर उपाध्यक्षपदासाठी अनिल गायकवाड यांना उमेदवारी दिली.

आज निवड प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी सहलीवर गेलेले सर्व संचालक दाखल झाले. यानंतर निवड प्रक्रिया सुरू झाली. यात अध्यक्षपदी रागिणी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची निवड घोषीत करण्यात आली. याप्रसंगी बोलतांना रागिणी चव्हाण यांनी आपण सभासदांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे नमूद केले.



