Home Cities जळगाव गोदावरी इंजिनिअरिंगचा राष्ट्रीय ईव्ही प्रशिक्षण उपक्रम यशस्वी; देशभरातील २७५ प्राध्यापकांचा सहभाग

गोदावरी इंजिनिअरिंगचा राष्ट्रीय ईव्ही प्रशिक्षण उपक्रम यशस्वी; देशभरातील २७५ प्राध्यापकांचा सहभाग

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) तंत्रज्ञानातील आधुनिक संशोधन, नवकल्पना आणि अध्यापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त संस्था) येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय राष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचा उत्साहात समारोप झाला. ऑनलाइन माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यांतील तब्बल २७५ प्राध्यापक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत “इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान आणि सहाय्यक प्रणाली” या विषयावर हा राष्ट्रीय स्तरावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योगातील बदलत्या गरजांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

पाच दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, चार्जिंग प्रणाली, स्मार्ट ग्रिड, ऊर्जा साठवणूक, सौर ऊर्जेवर आधारित ईव्ही चार्जिंग, फ्युएल सेल तंत्रज्ञान, गणितीय मॉडेलिंग तसेच ऑप्टिमायझेशन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर देशातील नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सहभागी प्राध्यापकांना संशोधनाधारित अध्यापनाची नवी दिशा मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी डॉ. पी. व्ही. व्ही. रामाराव यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले, तर डॉ. एन. एम. जी. कुमार यांनी ईव्ही वाहनांच्या विश्वासार्हतेच्या मूल्यमापनाबाबत माहिती दिली. दुसऱ्या दिवशी डॉ. वरप्रसाद जनामला यांनी स्मार्ट ग्रिड वातावरणातील व्हेईकल-टू-ग्रिड (V2G) प्रणालीची माहिती दिली, तर डॉ. बी. काव्या संतोषी यांनी शाश्वत वाहतुकीसाठी बुद्धिमान सौर ईव्ही चार्जिंग प्रणालीची आधुनिक संकल्पना स्पष्ट केली.

तिसऱ्या दिवशी डॉ. सुदर्शन एल. चव्हाण यांनी पीईएम इंधन सेल इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ग्राफीन आधारित नॅनो-कॉम्पोझिट मटेरियलच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. वरप्रसाद जनामला यांनी फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहनांच्या ऊर्जा साठवण प्रणालीच्या रचनेविषयी सविस्तर माहिती दिली. चौथ्या दिवशी प्रा. के. वैसाख यांनी ईव्ही तंत्रज्ञानातील ऑप्टिमायझेशन तंत्रांची माहिती दिली, तर डॉ. हेमचंद्र जी. यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या गणितीय प्रारूपणावरील तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या.

कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी प्रा. के. वैसाख यांनी ईव्ही ऑप्टिमायझेशनसाठी सॉफ्ट कम्प्युटिंग पद्धतींचे सादरीकरण केले. डॉ. हेमचंद्र जी. यांनी मॅटलॅब आणि सायलॅब आधारित प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सत्राद्वारे सहभागी प्राध्यापकांना इलेक्ट्रिक वाहनांचे मॉडेलिंग, विश्लेषण आणि आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर याबाबत सखोल प्रशिक्षण दिले.

या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. महेश एच. पाटील यांनी केले, तर समन्वयक म्हणून डॉ. सचिन आर. महेश्री यांनी जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. हर्षल मयूर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे अभिनंदन केले. अशा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाभिमुख दृष्टीकोन विकसित होऊन देशातील ईव्ही तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमामुळे देशभरातील शिक्षक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र येऊन ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. आधुनिक इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानातील नव्या संकल्पना आणि संशोधनाचा लाभ भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मत सहभागी प्राध्यापकांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound