जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील कॅटरिंग व्यवसायाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण निर्णय ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’ने घेतला आहे. असोसिएशनच्या निर्णयानुसार २१ जुलै २०२६ पासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रात्री १ वाजेनंतर कोणत्याही प्रकारची कॅटरिंग सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. कामगारांचे आरोग्य जपणे आणि वाढत्या अपघातांना आळा घालणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून लग्नसमारंभ, स्वागत समारंभ आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये कॅटरिंग कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत होते. अनेकदा पहाटेपर्यंत काम पूर्ण करून काही तासांतच पुन्हा सकाळी कामावर हजर व्हावे लागत असल्याने कामगारांना पुरेशी विश्रांती मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याबरोबरच रस्ते अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक १२ जुलै रोजी जळगाव येथील ओक मंगल कार्यालयात पार पडली. जिल्हाभरातील कॅटरिंग व्यावसायिक मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते. सर्व सदस्यांच्या एकमताने हा नियम मंजूर करण्यात आला असून तो २१ जुलै २०२६ पासून प्रभावीपणे लागू होणार असल्याची माहिती खानदेश कॅटरिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत यांनी दिली.
बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष दिनेश टाटिया, जळगाव शहराध्यक्ष सत्यनारायण जोशी, शहर उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव महेंद्र टाडा, खजिनदार गोपाल व्यास, मुख्य सल्लागार राजेंद्र वैष्णव यांच्यासह रामचंद्र टाडा, मेघराज महाराज, गोवर्धन गुर्जर, दुर्गेश सारस्वत, शिव अग्याल, भवर व्यास, मदन पुरोहित, मदन वैष्णव, बबलु महाराज, मोहन महाराज, शिवा तिवारी, ओम प्रजापत, केदार शर्मा, गुलाब महाराज आणि जिल्ह्यातील अनेक कॅटरिंग व्यावसायिक उपस्थित होते.
या निर्णयामुळे लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असून, कामगारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याने विविध स्तरांतून त्याचे स्वागत होत आहे.



