Home आरोग्य हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती

हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती

0
17

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रातील हृदयरुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ख्यातनाम हृदय व रक्तवाहिनी शल्यचिकित्सक (कार्डिओ व्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जन) डॉ. यतीन वाघ यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आपली सेवा सुरू केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे आता बायपास, हृदयाच्या झडपांच्या (व्हॉल्व्ह) शस्त्रक्रिया, जन्मजात हृदयरोग तसेच इतर जटिल हृदय शस्त्रक्रिया जळगावमध्येच अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध होणार आहेत.

डॉ. यतीन वाघ यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातून कार्डिओ व्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरीचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. हृदय शस्त्रक्रिया क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर त्यांनी हार्ट अँड व्हॅस्क्युलर केअर सेंटर आणि श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया आणि उपचार केले आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ आता उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना त्यांच्या परिसरातच मिळणार आहे.

महानगरांमध्ये उज्ज्वल करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही डॉ. वाघ यांनी आपल्या मातृभूमीत परतून येथील रुग्णांना महानगरांप्रमाणे दर्जेदार हृदय उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. उत्तर महाराष्ट्रात सुपरस्पेशालिटी आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे जाळे उभे करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. हृदयविकारांविषयी जनजागृतीसह अनेक गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत त्यांनी रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे.

डॉ. यतीन वाघ यांच्या कार्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेतील थोरॅसिक सर्जरी फाऊंडेशन, शिकागो यांच्या “Every Beat Matters – 2020” या उपक्रमासाठी त्यांची समन्वयक शल्यचिकित्सक म्हणून निवड झाली होती. तसेच राष्ट्रीय आरोग्यरत्न पुरस्कार, प्राऊड महाराष्ट्रीयन पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्या सेवेमुळे आता बायपास सर्जरी, हृदयाच्या झडपांच्या शस्त्रक्रिया, जन्मजात हृदयरोगावरील शस्त्रक्रिया, महाधमनी (एओर्टा) शस्त्रक्रिया तसेच इतर सर्व प्रकारच्या जटिल हृदय शस्त्रक्रिया अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध होतील. अनुभवी कार्डिओलॉजिस्ट, आधुनिक कॅथलॅब, कार्डियाक आयसीयू, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्तम दर्जाची उपचार सेवा दिली जाणार आहे.

यावेळी डॉ. यतीन वाघ म्हणाले, “रुग्णसेवा हीच माझ्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णाला वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि परवडणारे हृदयरोग उपचार मिळावेत, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.”

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, “उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना उपचारासाठी मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये जावे लागू नये, यासाठी सर्व सुपरस्पेशालिटी आरोग्यसेवा जळगावमध्ये उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. डॉ. यतीन वाघ यांच्यासारख्या अनुभवी हृदय शल्यचिकित्सकांच्या सहभागामुळे आमचा कार्डियाक सर्जरी विभाग अधिक सक्षम झाला असून याचा हजारो रुग्णांना निश्चितच लाभ होईल.”

डॉ. यतीन वाघ यांच्या नियुक्तीमुळे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उत्तर महाराष्ट्रातील हृदयरोग उपचारांचे अधिक विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ आणि सर्वसमावेशक उपचार सुविधांमुळे आता जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक आणि परिसरातील रुग्णांना उच्च दर्जाची हृदयसेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे.


Protected Content

Play sound