Home आरोग्य स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव ऑब्सटेट्रिक्स अ‍ॅन्ड गायनेकॉलॉजी सोसायटी (जॉग्स)च्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संदीपकुमार पाटील यांची अध्यक्षपदी, तर डॉ. शलाका पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली. यावेळी मातृमृत्यू कमी करण्याच्या दिशेने आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि डॉक्टरांच्या ज्ञानवृद्धीसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

जागतिक स्तरावर मातामृत्यू कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या जपायगो (Jhpiego) आणि फॉग्सी (FOGSI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) जळगावचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

या समारंभात अ‍ॅडव्हान्सिंग ग्लोबल स्ट्रॅटेजीज फॉर मॅटर्नल डेथ प्रिव्हेन्शन या विषयावर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी प्रसूतीनंतर होणाऱ्या अतिरक्तस्रावाच्या (पीपीएच) व्यवस्थापनासाठी आधुनिक शस्त्रक्रिया आणि उपचार पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. “जळगाव शून्य पीपीएच मातृमृत्यू” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व स्त्रीरोग तज्ज्ञांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी मातृ आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी समाजाभिमुख भूमिका पार पाडावी, असे प्रतिपादन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संदीपकुमार पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टरांचे कौशल्यविकास, रुग्णांसाठी जनजागृती, अद्ययावत वैद्यकीय प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

या कार्यक्रमाला आयएमएचे सचिव डॉ. पंकज शहा, जॉग्सच्या माजी अध्यक्षा डॉ. वैशाली चौधरी, माजी सचिव डॉ. अनिता बाविस्कर, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. सुधीर नारखेडे, डॉ. सुमन लोढा, डॉ. सुजाता महाजन, डॉ. रश्मी केळकर, डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक स्त्रीरोग तज्ज्ञ उपस्थित होते.
सन २०२६-२७ साठीच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून डॉ. संदीपकुमार पाटील, उपाध्यक्ष डॉ. आशिषकुमार वाघ, सचिव डॉ. शलाका पाटील, कोषाध्यक्ष डॉ. गजानन पाटील, सहसचिव डॉ. दिप्ती नेहते, डॉ. दिपा रत्नानी आणि डॉ. कोमल सरोदे, वैद्यकीय सचिव डॉ. प्रशांत पाटील, डॉ. पूनम येवले आणि डॉ. प्रथमेश जैन, तर सांस्कृतिक सचिव म्हणून डॉ. मेधावी चौधरी, डॉ. श्रद्धा राणे आणि डॉ. चंदन महाजन यांची निवड करण्यात आली.


Protected Content

Play sound