Home क्राईम जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक ; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, १६ जखमी

जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक ; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, १६ जखमी

0
14

जेजुरी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी वारीच्या पवित्र आणि भक्तिमय वातावरणाला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरात ट्रकने वारकऱ्यांना मागून जोरदार धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ वारकरी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायासह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर हा भीषण अपघात घडला. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ असताना मागून आलेल्या ट्रकने वारकऱ्यांच्या समूहाला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की तीन महिला वारकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनेक वारकरी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, वारकरी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना जेजुरी ग्रामीण रुग्णालयासह जवळील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यापैकी काही वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक हा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीशी संबंधित होता. अपघातातील मृत महिला वारकरी या सांगली जिल्ह्यातील कासबेडीगराज येथील दिंडीतील असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सात महिला वारकरी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, ट्रक चालकाला ताप आल्यामुळे त्याने औषधांच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्या औषधांमुळे त्याला ग्लानी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले असावे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound