यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा, जळगाव (पूर्व) जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, सावखेडा सिम येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नागेश्वर कौत्तीक साळवे यांची जिल्हाध्यक्षपदी, तर यावल येथील बबलू गणेश घारू यांची जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे यावल तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या कार्यकारिणीकडून संघटन बळकटीसाठी प्रभावी काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भाजपच्या राज्य व जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती मोर्चाच्या जळगाव (पूर्व) जिल्हा कार्यकारिणीची रचना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सावखेडा सिम येथील नागेश्वर कौत्तीक साळवे हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. संघटनात्मक कार्यातील अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे यावल येथील बबलू गणेश घारू यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या जळगाव (पूर्व) जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. संघटन विस्तार, पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यासाठी नव्या कार्यकारिणीला जबाबदारी देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या नियुक्त्यांचे रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, आमदार राजू मामा भोळे, आमदार नंदू महाजन तसेच भारतीय जनता पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि अनुसूचित जाती समाजातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



