Home Cities जळगाव गिरीश महाजनांचा थेट व्हिडिओ कॉल ; ४८५ किमी सायकल वारी करणाऱ्या महापौर...

गिरीश महाजनांचा थेट व्हिडिओ कॉल ; ४८५ किमी सायकल वारी करणाऱ्या महापौर दीपमाला काळेंचे अभिनंदन

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सुदृढ आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा संदेश देणारी जळगाव सायकलिस्ट ग्रुपची वार्षिक जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यंदाही उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर दीपमाला मनोज काळे यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्वतः सायकल चालवत ४८५ किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण करत विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी दर्शन घेतले. विशेष म्हणजे, वारी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्व सायकलपटूंचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.

जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सायकल वारीला गुरुवार, ९ जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता जळगाव येथील आकाशवाणी चौकातून प्रारंभ झाला. राष्ट्रगीताच्या गायनाने आणि महिला भगिनींनी केलेल्या औक्षणानंतर वारीला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. तीन दिवसांच्या प्रवासानंतर शनिवार, ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी संपूर्ण ग्रुप पंढरपूर येथे दाखल झाला. पंढरपुरात पोहोचताच सर्व सायकलिस्टांनी सायकली उंचावत आनंदोत्सव साजरा केला आणि विठ्ठलाच्या नामघोषात वारीची यशस्वी सांगता झाली.

यंदाच्या वारीत जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या एकूण ७५ सदस्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ६० पुरुष, ८ महिला अशा ६८ मुख्य सायकलिस्टांसह सहाय्यक सदस्यांचा समावेश होता. सर्वांनी मिळून जळगाव ते पंढरपूर हे तब्बल ४८५ किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि सामूहिक एकतेचा उत्कृष्ट आदर्श निर्माण केला. वारी सुखरूप पूर्ण झाल्यानंतर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे महापौर दीपमाला काळे आणि सर्व सायकलपटूंशी संवाद साधला. त्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत सर्व सहभागींचे अभिनंदन केले तसेच अशा उपक्रमांमधून समाजात आरोग्य आणि पर्यावरणाबाबत सकारात्मक जनजागृती होत असल्याचे सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वारी पूर्ण झाल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, माऊलींच्या चरणी सायकल वारी करण्याचे हे त्यांचे सलग दुसरे वर्ष आहे. ही वारी केवळ धार्मिक श्रद्धेची नसून आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश देणारी सामाजिक चळवळ आहे. नियमित सायकल चालवल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, तसेच पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणालाही हातभार लागतो. हा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, हीच या उपक्रमामागील प्रमुख भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर काळे यांनी पुढे सांगितले की, गेल्या १५३ दिवसांपासून जळगाव शहराच्या प्रथम नागरिक म्हणून काम करताना आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण या विषयांना त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताना त्यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या समृद्धीसाठी, शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी सुरू असलेल्या विकास उपक्रमांना यश लाभावे, अशी प्रार्थना केली. जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या या यशस्वी सायकल वारीचे तसेच महापौर दीपमाला काळे यांच्या जिद्द, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकीचे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कौतुक होत आहे. धार्मिक श्रद्धा, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक जनजागृती यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविला जावा, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound