Home Cities चाळीसगाव टहाकळी बालिकेच्या मृत्यूचा मुद्दा विधानपरिषदेत ; एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण

टहाकळी बालिकेच्या मृत्यूचा मुद्दा विधानपरिषदेत ; एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण

0
22

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणानंतर एका बालिकेचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेचा मुद्दा विधानपरिषदेत पोहोचला आहे. या संवेदनशील प्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारकडे जाब विचारला. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लेखी उत्तर देत या प्रकरणाची विविध स्तरांवर चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.

आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात बालिकेच्या मृत्यूनंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचा मुद्दाही उपस्थित केला. त्यामुळे नातेवाईकांना रात्रभर मृतदेह मांडीवर घेऊन रुग्णालयाबाहेर बसावे लागल्याची घटना समोर आली होती. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, १२ मे २०२६ रोजी टहाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित लसीकरण सत्रादरम्यान संबंधित बालिकेला पेंटाव्हॅलेंट आणि ओपीव्ही (ओरल पोलिओ) लसीचे डोस देण्यात आले होते. त्यानंतर सुमारे दीड ते दोन तासांत बालिकेची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृतदेहाच्या शवविच्छेदनासंदर्भात स्पष्टीकरण देताना मंत्र्यांनी सांगितले की, मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्र हॉस्पिटल मॅन्युअल आणि कायदेशीर कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, जसे की मृत्यू प्रमाणपत्र, पोलीस आदेश आणि इन्क्वेस्ट पंचनामा उपलब्ध नसल्यामुळे त्या वेळी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हास्तरीय एईएफआय (Adverse Events Following Immunization) समितीकडून चौकशी सुरू असल्याची माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने २५ जून २०२६ रोजी स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना केली असून, या समितीला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले.


Protected Content

Play sound