Home Cities जळगाव जळगाव जिल्हा न्यायालयात अत्याधुनिक एटीएम सुविधा सुरू; माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या...

जळगाव जिल्हा न्यायालयात अत्याधुनिक एटीएम सुविधा सुरू; माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या एटीएम मशीनचे उद्घाटन भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते बुधवारी (दि. ८ जुलै) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. न्यायालय परिसरात प्रथमच उपलब्ध झालेल्या या सुविधेमुळे न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी न्यायालय हे सर्वसामान्य पक्षकारांसाठी असल्याचे सांगत त्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली ही सुविधा अत्यंत स्तुत्य असल्याचे नमूद केले. न्यायालय आणि वकिलांमध्ये परस्पर सलोखा व समन्वय राहणे ही न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी आवश्यक बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अनेक न्यायालयांमध्ये एटीएमची सुविधा उपलब्ध नसताना जळगाव जिल्हा न्यायालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी भूषण गवई यांनी जळगाव जिल्हा वकील संघाच्या कक्षाला भेट देत वकिलांशी संवाद साधला. तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेच्या फलकाचे अनावरण करून संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी, जिल्हा न्यायाधीश-१ एस. व्ही. खोंगल, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सागर चित्रे, जिल्हा सरकारी वकील, न्यायालयातील सर्व न्यायाधीश, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व शाखा व्यवस्थापक, वकील संघाचे पदाधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायालय परिसरात सुरू झालेल्या या एटीएम सुविधेमुळे न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या पक्षकारांना रोख रक्कम उपलब्ध करून घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. तसेच वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ होणार असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound