Home प्रशासन रावेरमध्ये रस्ते झाले मोकळे; बुलडोझर कारवाईचे नागरिकांकडून स्वागत

रावेरमध्ये रस्ते झाले मोकळे; बुलडोझर कारवाईचे नागरिकांकडून स्वागत

0
11


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असताना प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. नगर परिषद, पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला. या धडक कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर प्रशासनाने ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले असून नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेत स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच अंकलेश्वर–बुऱ्हाणपूर महामार्गालगत शहरातील दोन्ही बाजूंवरील फूटपाथ आणि रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे हटविण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने ही कारवाई आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शहर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. प्रशासनाने अखेर बुलडोझरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतल्याने शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाईदरम्यान अनेक अनधिकृत शेड, फूटपाथवरील अडथळे आणि रस्त्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या संरचना हटविण्यात आल्या.

या कारवाईनंतर आता शहरातील सर्वाधिक अतिक्रमणग्रस्त परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी मंदिरासमोरील रस्त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. जुन्या रावेरमधील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी याच मार्गाने नव्या वसाहतीतील शाळांमध्ये ये-जा करतात. त्यामुळे हा रस्ता तातडीने अतिक्रमणमुक्त करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.

ही संयुक्त मोहीम रावेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्ड, पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि तहसीलदार दीपा जेढे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. तीन बुलडोझरच्या सहाय्याने शहरातील विविध भागांतील अतिक्रमण हटविण्याचे काम करण्यात आले. प्रशासनाने ही मोहीम पुढील काही दिवसही सुरू ठेवण्याचे संकेत दिल्याने उर्वरित अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कारवाईदरम्यान काही अतिक्रमणधारक आणि दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली. मात्र दुसरीकडे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रशासनाच्या धाडसी निर्णयाचे स्वागत करत शहर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी केली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात, अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली.

रावेर शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या या संयुक्त मोहिमेमुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे. शहराचा चेहरा बदलण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित, सुटसुटीत रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound