Home आरोग्य गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग...

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांचे यश

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गर्भधारणेदरम्यान उद्भवलेल्या अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या अवस्थेत २० वर्षीय महिलेचे प्राण वाचविण्यात जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांना यश आले आहे. गर्भाशयाऐवजी फलोपियन नलिकेत वाढलेल्या गर्भामुळे (एटोपिक प्रेग्नन्सी) नळी फुटून पोटात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. मात्र, वेळेवर निदान आणि तातडीच्या शस्त्रक्रियेमुळे महिलेचा जीव वाचविणे शक्य झाले.

ममता (वय २०) या महिलेला अचानक तीव्र पोटदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत तिचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्याचे आणि नाडीचे ठोके वाढल्याचे आढळले. सोनोग्राफीमध्ये गर्भाशयात गर्भ नसून तो फलोपियन नलिकेत वाढत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान नळी फुटल्याने पोटात मोठ्या प्रमाणात रक्त साचले होते. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्त्रीरोग तज्ज्ञांनी तातडीने लॅप्रोटोमी शस्त्रक्रिया केली. पोटात साचलेले रक्त बाहेर काढून फुटलेल्या नलिकेतील गर्भ काढण्यात आला आणि रक्तस्त्राव थांबविण्यात आला. भूलतज्ज्ञ, रक्तपेढी विभाग आणि शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

या रुग्णावर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील आणि डॉ. ऐश्वर्या चलवदे यांनी यशस्वी उपचार केले. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच गर्भधारणेदरम्यान पोटदुखी, चक्कर येणे किंवा रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.


Protected Content

Play sound