


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बालशल्यचिकित्सा व बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख तथा ज्येष्ठ बाल मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांची इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्स अंतर्गत कार्यरत ‘सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड झाली आहे. या प्रतिष्ठेच्या नियुक्तीमुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’ ही देशातील बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्रातील सर्वात अग्रगण्य आणि प्रतिष्ठित संस्था मानली जाते. लहान मुलांमधील मूत्ररोग, जन्मजात विकार आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धतींवर कार्य करणाऱ्या तज्ज्ञांना एकत्र आणणाऱ्या या संस्थेच्या चेअरमनपदी डॉ. मिलिंद जोशी यांची झालेली निवड ही त्यांच्या दीर्घकालीन वैद्यकीय अनुभव, संशोधनवृत्ती आणि उत्कृष्ट रुग्णसेवेची राष्ट्रीय स्तरावरील दखल मानली जात आहे. डॉ. जोशी यांनी बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्रात विशेषतः लहान मुलांमधील मुतखड्यांवरील दुर्बिणीद्वारे (एन्डोस्कोपिक) शस्त्रक्रिया, जन्मजात मूत्ररोग विकारांवरील उपचार आणि आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाच्या वापरातून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी भारतासह परदेशातही अनेक यशस्वी शस्त्रक्रिया करून या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संशोधनपर कार्यामुळे आणि नाविन्यपूर्ण उपचार पद्धतींमुळे अनेक बालरुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्राला नवी दिशा मिळेल, तसेच संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि अत्याधुनिक उपचार पद्धतींच्या प्रसाराला अधिक चालना मिळेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे देशभरातील बालरुग्णांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. मिलिंद जोशी यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्यासह विविध वैद्यकीय संघटना, सहकारी डॉक्टर, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



