Home Cities जळगाव सहकार सप्ताहानिमित्त जळगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद 

सहकार सप्ताहानिमित्त जळगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद 

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या निर्देशानुसार साजऱ्या होत असलेल्या सहकार सप्ताहानिमित्त जळगाव जिल्ह्यात विविध जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण तसेच सहकार दिंडीच्या माध्यमातून सहकार चळवळीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव कार्यालयाच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमांना अधिकारी, कर्मचारी आणि सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

केंद्र सरकारच्या सहकार विभागाने २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत देशभर सहकार सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व सहकार विभागांच्या कार्यालयांमार्फत विविध सामाजिक, जनजागृतीपर आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात आहेत.

जळगाव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने या सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण आणि सहकार दिंडीचे नियोजन केले. त्याअंतर्गत १ जुलै २०२६ रोजी गोळवलकर रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. याच दिवशी ICAI च्या सहकार्याने नवीन प्रशासकीय इमारत, आकाशवाणी चौक, जळगाव येथे वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासह हरित जळगाव घडविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

दरम्यान, ३ जुलै २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड आणि जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. आकाशवाणी चौकातून प्रारंभ झालेली ही दिंडी महाराणा प्रताप चौक, बहिणाबाई उद्यान, स्वातंत्र्य चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात समारोपास पोहोचली. दिंडीद्वारे सहकार चळवळीचा प्रसार आणि सहकाराच्या मूल्यांचा प्रचार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक धर्मराज पाटील, उपनिबंधक विशाल ठाकूर, विशेष लेखापरीक्षक ए. जी. पाटील, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जनता बँक, सहकार बोर्ड, गृहनिर्माण सोसायट्या, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सोसायटी, बळवंत नागरी सहकारी संस्था, ICAI चे प्रतिनिधी हितेश आगीवाल, सहकार विभागातील अधिकारी-कर्मचारी, लेखापरीक्षक आणि विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.


Protected Content

Play sound