Home राजकीय रोहित निकम यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

रोहित निकम यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

0
10


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक आणि युवा सहकार नेते रोहित निकम यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मानाचा ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि ‘सहकारी महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार चळवळीला नवे नेतृत्व आणि नवी दिशा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

रोहित निकम यांनी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांपासून राज्याच्या शिखर सहकारी संस्थांपर्यंत उल्लेखनीय कार्य करत सहकार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघातील संचालक म्हणून काम करताना त्यांनी सहकार चळवळीच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच इतर महत्त्वाच्या सहकारी संस्थांमधील त्यांच्या नेतृत्वाची दखल घेत पुरस्कार निवड समितीने त्यांची ‘युवा सहकार पुरस्कार’साठी निवड केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यामध्ये सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. सहकार क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी युवकांनी सहकार चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री पंकज भोयर, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार चित्रा वाघ, विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, सचिव रामदास मोरे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी प्रास्ताविकात राज्यातील सहकार चळवळीची सद्यस्थिती, सहकारी संस्थांचे बळकटीकरण आणि भविष्यातील धोरणांवर प्रकाश टाकला. सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था आणि युवा नेतृत्वाचा गौरव केल्याने या क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. राज्यभरातील जिल्हा बँका, पतसंस्था, सहकारी संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि सहकार क्षेत्राशी संबंधित मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Protected Content

Play sound