Home Cities जळगाव एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण 

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण 

0
4


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकामध्ये पाण्याचा कार्यक्षम आणि शाश्वत वापर वाढविण्यासाठी प्रायमार्क कापूस प्रकल्पांतर्गत जळगाव येथे ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ४८ गावांतील शेतकरी महिलांना वैज्ञानिक पद्धतीने पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षित महिला पुढे आपल्या गावांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करणार आहेत.

जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात संभाव्य एल निनोमुळे निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन कापूस पिकासाठी पाण्याचे नियोजन, पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी कोणत्या आधुनिक शेती तंत्रांचा वापर करावा, यावर विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान कापूस पिकासाठी एक सरी आड सिंचन पद्धती, माती आणि वनस्पती निर्देशकांच्या आधारे सिंचनाचे वेळापत्रक निश्चित करणे, सूर्यफूलाच्या संकेतांचा उपयोग, पानांवरील सुकण्याची लक्षणे ओळखून पाणी देण्याची योग्य वेळ ठरविणे, ठिबक सिंचनासोबत मल्चिंगचा वापर करून पाण्याची बचत करणे तसेच अतिरिक्त पावसाचे पाणी साठवून जलसंधारणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक प्रा. निलेश भागवत सदार यांनी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे शेतीसमोर नवीन आव्हाने उभी राहत असून वैज्ञानिक पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास कापूस उत्पादनात सातत्य राखणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक परिणामकारक वापर करणे शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल. कार्यक्रमाला सेवा फाउंडेशनचे प्रतिनिधी, प्रशिक्षक तसेच विविध गावांतील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रशिक्षणादरम्यान महिलांनी विविध तांत्रिक बाबींवर प्रश्न विचारत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. या महिलांमार्फत गावागावांत पाणी व्यवस्थापनाचे ज्ञान पोहोचविण्यात येणार असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.


Protected Content

Play sound