


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वारकरी परंपरा, गोसेवा आणि निःस्वार्थ भावनेचा सुंदर संगम अनुभवायला मिळावा, अशी आगळीवेगळी घटना पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे घडली. येथून प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘निर्लोभ पायी दिंडी’ शुक्रवारी (३ जुलै) गाय-वासरासह पंढरपूरकडे प्रस्थान करताच परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गाय आणि वासरू दिंडीत सहभागी झाल्याने हा सोहळा पंचक्रोशीत विशेष चर्चेचा विषय ठरला.
दिंडीच्या प्रारंभी गोसेवक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली गोपूजनाचा विधी पार पडला. दिंडीसोबत जाणाऱ्या देशी गोमाता आणि वासराचे पूजन गावातील सौ. वंदना उत्तमराव पाटील यांच्या हस्ते हळद-कुंकू, फुले अर्पण करून व औक्षणाने करण्यात आले. गोमातेच्या गळ्यात तुळशीचा हार घालून कपाळावर गंध लावण्यात आला. यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि **‘ज्ञानोबा-तुकाराम’**च्या जयघोषात दिंडीने पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. या भक्तिमय वातावरणाने उपस्थित भाविक भारावून गेले.
दिंडीच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाध्यक्ष बन्सीलाल इंदरचंद जैन, ज्येष्ठ प्राध्यापक भागवत महालपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी दिंडीला शुभेच्छा देत या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हाध्यक्ष बन्सीलाल जैन यांनी गोमातेसह निघालेली ही दिंडी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल, असे सांगत कृषी संस्कृती आणि वारकरी परंपरेचा हा अनोखा मिलाफ असल्याचे नमूद केले. प्रा. भागवत महालपुरे यांनी निर्लोभ भावनेतून आयोजित करण्यात आलेली ही वारी सातगाव डोंगरीच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असल्याचे सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देत दिंडीला हिरवा झेंडा दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. आर. वाघ यांनी केले. यावेळी परिसरातील भजनी मंडळे, नांदगाव, तिडका, वाकडी येथील टाळकरी, महिला, युवक आणि शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही. याबाबत माहिती देताना गोसेवक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले की, ही पूर्णपणे ‘निर्लोभ पायी दिंडी’ असून प्रत्येक वारकरी स्वतःचा खर्च स्वतः करणार आहे. मुक्या जनावरांनाही विठ्ठलाचे दर्शन घडावे या भावनेतून गोशाळेतील गाय आणि वासराला दिंडीत सहभागी करण्यात आले आहे. दिंडी सुखरूप पंढरपूरला पोहोचावी, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडीचा पहिला मुक्काम पाचोरा शहरातील विठ्ठल मंदिरात होणार असून त्यानंतर सुमारे २० दिवसांचा आणि जवळपास ५०० किलोमीटरचा पायी प्रवास करत आषाढी एकादशीपूर्वी ही दिंडी पंढरपूर येथे दाखल होणार आहे. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या दिंडीमुळे वारकरी परंपरेला नवी प्रेरणा मिळाली असून गोसेवा आणि भक्तीचा संदेशही समाजात प्रभावीपणे पोहोचत आहे.



