Home क्राईम जळगाव पोलिसांचा मोठा निर्णय! ९० बेवारस वाहनांचा होणार जाहीर लिलाव

जळगाव पोलिसांचा मोठा निर्णय! ९० बेवारस वाहनांचा होणार जाहीर लिलाव

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या आवारात अनेक वर्षांपासून पडून असलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा ९० बेवारस वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित वाहनांवर दावा असलेल्या मालकांनी ६० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह पुढे यावे, अन्यथा या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५८ अन्वये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या आवारात दीर्घकाळापासून बेवारस अवस्थेत असलेली वाहने गंजून खराब होत असून, त्यांचे मालक शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने वारंवार प्रयत्न केले. मात्र संबंधित वाहनांचे मालक अथवा हक्क सांगणारी कोणतीही व्यक्ती पुढे न आल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.

जाहीरनाम्यानुसार, संबंधित वाहनांवर मालकी हक्क, हितसंबंध, वारसा हक्क, तारण हक्क (Hypothecation) किंवा विमा दावा (Insurance Claim) असलेल्या व्यक्तींनी जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत सर्व मूळ कागदपत्रांसह संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधून आपला दावा नोंदवावा. निर्धारित मुदतीत दावा न केल्यास संबंधित वाहनांवरील हक्क ग्राह्य धरला जाणार नाही. मुदत संपल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार या सर्व वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहनमालकांनी किंवा संबंधित वित्तसंस्था, विमा कंपन्या व अन्य हक्कधारकांनी वेळेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस ठाण्यांच्या आवारातील बेवारस वाहनांचा वाढता साठा कमी करून जागेचा योग्य वापर करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असून, पात्र दावेदारांनी मुदतीपूर्वीच पुढे येण्याचे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.


Protected Content

Play sound