Home क्राईम रावेर तालुक्यात महसूल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर...

रावेर तालुक्यात महसूल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

0
13


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केल्या आहेत. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात एकच चर्चा सुरू आहे.

रावेर तालुक्यात पाल, खिरवड, आटवडे, दसनूर, निभोरा आणि कोचूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत तहसीलदार दीपा जेधे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने विशेष सापळा रचून कारवाई केली. पहिली कारवाई खिरवड–पातोंडी रस्त्यावर करण्यात आली असून, अनधिकृत गौणखनिज वाहतूक करताना ट्रॅक्टर क्रमांक MP-11-AA-8777 जप्त करण्यात आला. या वाहनाचा मालक शोएब शाह आरिफ शाह (रा. खिरवड, ता. रावेर) असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी प्रशांत जाधव, सुधीर इंगळे तसेच महसूल सेवक प्रवीण धनके सहभागी होते.

दुसरी कारवाई बलवाडी परिसरातील सुकी नदीपात्रात करण्यात आली. येथे निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर अनधिकृत गौणखनिज वाहतूक करताना आढळून आला. या वाहनाचा चेसिस क्रमांक 391340HA000368 असून मालक प्रवीण प्रभाकर कोळी (रा. आंदलवाडी) असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी अश्विनी हांडे, स्मिता कोळी, हर्षल पाटील, मंडळ अधिकारी प्रवीणकुमार नेहते, प्रवीण वानखडे तसेच महसूल सेवक बलवाडी यांचा सहभाग होता. महसूल पथकाने दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केले आहेत.

दरम्यान, सुकी नदी व भोकर नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचेही समोर आले आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना मोठा दणका बसला असून पुढील काळात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 


Protected Content

Play sound