Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांची कमाल ; ‘चार्ज शेअर’ ॲपमुळे ईव्ही चार्जिंग होणार सोपे

मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांची कमाल ; ‘चार्ज शेअर’ ॲपमुळे ईव्ही चार्जिंग होणार सोपे

0
14


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अकोला येथील एलआरटी कॉलेजमध्ये आयोजित ‘शार्क टँक’ प्रकारच्या स्पर्धेसाठी मुक्ताईनगरच्या विद्यार्थिनीसह ११ विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘चार्ज शेअर’ हे नाविन्यपूर्ण ॲप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) स्मार्ट चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या ॲपमुळे ईव्ही वापरणाऱ्या कंपन्या आणि वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.

अकोला येथील एलआरटी कॉलेजमध्ये ४ डीच्या वाणिज्य सीए शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाहेती एज्युकेशन क्लासेसच्या मार्गदर्शनाखाली ‘चार्ज शेअर’ ॲपची निर्मिती केली आहे. या यशस्वी टीममध्ये मुक्ताईनगर येथील विद्यार्थिनी आर्या मुकेश महल्ले हिचा समावेश आहे. तिच्या या कामगिरीमुळे मुक्ताईनगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘चार्ज शेअर’ हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार करण्यात आलेले स्मार्ट चार्जिंग प्लॅटफॉर्म आहे. मोबाईल रोमिंगमध्ये एका सिमकार्डद्वारे विविध नेटवर्कचा वापर करता येतो, त्याच धर्तीवर या ॲपच्या माध्यमातून ईव्ही चालकांना विविध चार्जिंग कंपन्यांची स्टेशन एका ॲपद्वारे वापरता येणार आहेत. हे ॲप सर्व चार्जिंग नेटवर्कला एकत्र जोडण्याचे काम करते. दुचाकी, चारचाकी तसेच ट्रक चालकांना केवळ एका ॲप किंवा आरएफआयडी कार्डच्या माध्यमातून उपलब्ध चार्जिंग स्टेशनवर वाहन चार्ज करता येणार आहे. वाहन चार्ज करण्यासाठी साधारण ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागणार असून, ॲपच्या माध्यमातून जवळपास १२० किलोमीटर अंतरातील चार्जिंग स्टेशनची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे.

सध्या ईव्ही फ्लीट कंपन्यांना वेगवेगळ्या चार्जिंग स्टेशनसाठी अनेक ॲप्स, पेमेंट प्रणाली आणि बिल व्यवस्थापन करावे लागते. ‘चार्ज शेअर’मुळे या सर्व समस्या दूर होऊन ईव्ही व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे. तसेच या तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यास आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे.‘चार्ज शेअर’ ॲपची वैशिष्ट्ये म्हणजे एकाच ॲपवर अनेक चार्जिंग स्टेशनची सुविधा, एकत्रित बिलिंग व सोपे पेमेंट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित योग्य चार्जिंग स्टेशनची माहिती, वेळ आणि खर्चाची बचत तसेच ईव्ही फ्लीटचे सुलभ व्यवस्थापन हे आहेत. यापूर्वी अशा प्रकारच्या सुविधा अमेरिकेत वापरल्या जात होत्या. आता हे ॲप भारतातही वापरासाठी उपलब्ध होणार असून, ईव्ही क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे.  ‘चार्ज शेअर’ ॲप निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टीममध्ये आर्या महल्ले, वैष्णवी पाटील, अदिती लड्डा, भूमिका अग्रवाल, वेदिका पोहरे, सई जोरगेकर, हनी वोरा, रुद्र जैन, ओम वाघ, कार्तिक सोनी आणि दक्ष रांडद यांचा समावेश आहे.


Protected Content

Play sound