


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक केंद्रासमोर कंत्राटी कामगारांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस असताना तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने उपचारासाठी वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, प्रकृती बिघडूनही इतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
दीपनगर येथील औष्णिक केंद्रात हजारो कामगार विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. यातील मोठा वर्ग हा ठेकेदारांच्या माध्यमातून काम करतो. ठेकेदारांकडून होत असलेल्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. उपोषणाचा सातवा दिवस उजाडताच तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. त्यांना आंदोलनस्थळावरून उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, कामगारांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. जोपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, तीन उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी उर्वरित कामगारांनी आंदोलन मागे घेतलेले नाही. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची मागणी कामगारांकडून केली जात आहे. यावेळी अरुण बाविस्कर यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.



