Home क्राईम एसीबीने सील केलेले मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे जळगावातील घर फोडले ; दोन जण रंगेहाथ...

एसीबीने सील केलेले मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे जळगावातील घर फोडले ; दोन जण रंगेहाथ अटकेत

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतर सील करण्यात आलेल्या अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या जळगावातील घरात घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गणेश कॉलनी परिसरातील सीलबंद घराचे कुलूप तोडून मध्यरात्री प्रवेश करणाऱ्या दोन जणांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अकोला येथील सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या कारवाईनंतर जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथील त्यांच्या घराला एसीबीकडून सील करण्यात आले होते. मात्र, रविवारी मध्यरात्री या सीलबंद घरातून आवाज येत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस आणि संबंधित यंत्रणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून शिडीच्या सहाय्याने घरात प्रवेश केलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत प्रसाद नारखेडे (रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रवीण महाजन (रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात अटकेत असलेले दोन्ही संशयित आरोपी हे किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ चोरीचा प्रयत्न होता की, एसीबीच्या कारवाईशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे हटविण्याचा प्रयत्न होता, याचा तपास पोलीस करत आहेत. घरातील रोख रक्कम, मौल्यवान वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्रे एसीबीच्या कारवाईपूर्वी हटविण्याचा कट होता का, तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ही घुसखोरी करण्यात आली होती का, या सर्व बाबींचा तपास जळगाव पोलीस करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, घरातून संपर्क क्रमांक आणि हिशोबाची नोंद असलेली डायरी लांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सीलबंद घरात झालेल्या या घुसखोरीमुळे लाच प्रकरणाशी संबंधित तपासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.


Protected Content

Play sound