Home प्रशासन वरणगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वरणगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

0
12


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगरपरिषदेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेत आर्थिक अनियमितता, बनावट बँक गॅरंटी, संशयास्पद देयके आणि कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार, अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत तक्रारदार अजय अनिलकुमार जैन यांनी वरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले असून, त्यामध्ये पाणीपुरवठा योजनेतील कथित अनियमिततांचा उल्लेख करण्यात आला आहे. निवेदनानुसार, योजनेच्या कामात बनावट बँक गॅरंटीचा वापर करून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या वापराबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तक्रारीत पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पाईपलाईन, जलशुद्धीकरण केंद्र, जलसाठा टाक्या तसेच इतर बांधकामांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण प्रकल्पाचे तृतीय पक्षामार्फत तांत्रिक परीक्षण (Third Party Technical Audit) करून वस्तुस्थिती समोर आणावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकल्पाचे विशेष लेखापरीक्षण (Special Audit) करण्यात यावे, संबंधित कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत नवीन देयके अदा करू नयेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे वरणगाव शहरात चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांनीही या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Protected Content

Play sound