


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून पुढील काही तासांत धरणातून विसर्ग सोडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तापी आणि पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दिनांक 28 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार नियंत्रित विसर्ग सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात किंवा सखल भागात जाणे टाळावे, तसेच पशुधन व आवश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असेही सूचित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून धरणातील पाणीपातळी व हवामानाचा अंदाज पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.



