


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील भिरूड वाडा परिसरात पावसाच्या सुरुवातीलाच जलसाचण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना तसेच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
डोंगर कठोरा परिसरात गेल्या सात-आठ दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसामुळे भिरूड गल्ली भागातील मुख्य रस्त्यावर रहिवासी रेवानंद भिरूड आणि विलास भिरूड यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे परिसरात अक्षरशः तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.
या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच तथा प्रशासक नवाज तडवी यांच्याकडे तक्रार करून परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी रेती टाकून तात्पुरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ही उपाययोजना कायमस्वरूपी नसल्याने समस्या जैसे थे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शनिवार, दि. २७ जून रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर पुन्हा एकदा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्याची पातळी वाढून रेवानंद भिरूड आणि विलास भिरूड यांच्या घराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले. त्यामुळे संबंधित कुटुंबांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. तसेच या मुख्य रस्त्यावरून पायी किंवा वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर आगामी काळात अतिवृष्टीच्या वेळी काय परिस्थिती निर्माण होईल, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, टाकण्यात आलेली रेती व्यवस्थित पसरवण्यात आलेली नसल्यामुळे पाणी साचण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवासी रेवानंद भिरूड, विलास भिरूड यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.



