


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील मिश्किनशाहबाबा नगर आणि गोंधळी वाडा परिसरातील नागरिकांनी स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलाच्या समस्येबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेत आपली व्यथा मांडली. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वापर कमी असतानाही अवाजवी वीजबिले येत असल्याचा आरोप करत नागरिकांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
या परिसरातील महिला व नागरिकांनी दि. २६ रोजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन वाढीव वीजबिलाबाबत तक्रारी मांडल्या. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भार सहन करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मिश्किनशाहबाबा नगर आणि गोंधळी वाडा परिसरात प्रामुख्याने मजूर व सामान्य कुटुंबातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे अचानक वाढलेल्या वीजबिलांमुळे नागरिकांच्या आर्थिक अडचणीत भर पडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कमी वापर असूनही हजारो रुपयांची बिले येत असल्याने एवढी मोठी रक्कम भरायची कशी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
नागरिकांनी सांगितले की, यापूर्वी परिसरात जुन्या मीटरच्या माध्यमातून वीजपुरवठा होत होता. त्यावेळी वीजबिले तुलनेने कमी येत होती. मात्र नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून महावितरणने याची योग्य तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वाढत्या वीजबिलाच्या समस्येबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित वीज ग्राहकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
याबाबत नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, परिसरातील वीज ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्येची पाहणी करावी. वाढीव वीजबिलाबाबत योग्य तो तोडगा काढून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जातील. दरम्यान, महावितरणचे शहर अभियंता गौतम मोरे यांनी सांगितले की, या परिसरातील वीज ग्राहकांकडे वीज वितरण कंपनीचे लाईनमन व अधिकारी प्रत्यक्ष भेटी देतील. वीज वापर, मीटरची स्थिती आणि बिलासंदर्भातील माहिती घेऊन वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.



