


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि वाचन कौशल्याला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रेरणादायी, ऐतिहासिक आणि बोधप्रद गोष्टींचे वाचन करून आपल्या कल्पनाशक्तीला वाव दिला.
शनिवारच्या दिवशी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाच्या दप्तराच्या ओझ्यातून मुक्त करून आनंददायी आणि ज्ञानवर्धक वातावरण निर्माण करण्यात आले. गोष्टी वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, आकलन क्षमता वाढविणे तसेच आत्मविश्वास वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध विषयांवरील गोष्टींचे प्रभावी वाचन केले. यामध्ये प्रतिक प्रदीप पाटील, दर्शन सुयोग लोखंडे, दर्शन नवल सोनवणे, सुहाना समीर तडवी, दिव्या बळीराम सोनवणे आणि शर्वरी नितीन सोनवणे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वाचन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. गोष्टी वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यासोबतच संभाषण कौशल्य, विचार करण्याची क्षमता आणि सादरीकरणाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असल्याचे यावेळी दिसून आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
या उपक्रमाविषयी बोलताना शाळेचे पर्यवेक्षक के. आर. पाटील यांनी सांगितले की, पुस्तक वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळते. नियमित वाचनाची सवय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवते. गोष्टी वाचनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्या संभाषण क्षमतेत निश्चितच भर पडते. विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने गोष्टी सादर केल्या. शाळेच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होत असून शिक्षणासोबत आनंददायी अनुभव देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.



