Home प्रशासन महाराष्ट्र पोलीस दलातील API पद कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

महाराष्ट्र पोलीस दलातील API पद कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

0
20


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक (API) हे पद कायमस्वरूपी रद्द करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या अधिकाऱ्यांना थेट पोलीस निरीक्षक (PI) पदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशन (जळगाव जिल्हा) यांनी केली आहे. यासंदर्भात असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

पोलीस कायद्यात उल्लेख नसतानाही महाराष्ट्र पोलीस दलात निर्माण करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक (API) पदामुळे अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेत मोठा अडसर निर्माण होत असल्याचा दावा पोलीस बॉईज असोसिएशनने केला आहे. त्यामुळे हे पद कायमस्वरूपी बंद करून पदोन्नतीची प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पोलीस बॉईज असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण पंढरीनाथ नगरे आणि जिल्हा उपाध्यक्ष हेमंत हरी तावडे यांनी २५ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन पाठविले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशातील इतर कोणत्याही राज्याच्या पोलीस दलात तसेच केंद्र शासनाच्या विविध सुरक्षा दलांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक (API) हे पद अस्तित्वात नाही. केंद्रीय पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), रेल्वे पोलीस दल (RPF) यांसह अन्य दलांमध्ये कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक उपनिरीक्षक (ASI), पोलीस उपनिरीक्षक (SI) आणि त्यानंतर थेट पोलीस निरीक्षक अशी पदोन्नतीची श्रेणी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मात्र पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक पदावर जाण्यासाठी मोठा कालावधी लागतो. PSI पदानंतर साधारण ७ ते ८ वर्षांनी API आणि त्यानंतर पुन्हा ७ ते ८ वर्षांनी PI पदावर पदोन्नती मिळत असल्याने अधिकाऱ्यांना तब्बल १४ ते १६ वर्षांचा विलंब सहन करावा लागत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

या दीर्घ पदोन्नती प्रक्रियेमुळे अनेक अधिकारी पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सेवानिवृत्त होत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस कायद्यानुसार महाराष्ट्रात पोलीस शिपाई, हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अशीच पदरचना असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. API पदामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. PSI अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार थेट PI पदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी भूमिका पोलीस बॉईज असोसिएशनने मांडली आहे.


Protected Content

Play sound