


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्रकारांना धमकी दिल्याच्या कथित प्रकाराचा निषेध करत वरणगाव पत्रकार संघटनेच्या वतीने वरणगाव पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी घोषणाबाजी करत संबंधित लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्याची मागणी केली.
मुंबई येथे शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना प्रश्न विचारल्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील पत्रकार संघटनेने आंदोलन केले. वरणगाव पोलीस स्टेशनसमोर जमलेल्या पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत पत्रकारांवरील धमकीच्या प्रकाराचा निषेध नोंदविला. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे वातावरण मिळावे तसेच धमकी देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय पाटील यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. पत्रकारांच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
वरणगाव पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात विजय वाघ, मनोहर लोणी, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आवाज उठविला. पत्रकारांना धमकी दिल्याच्या आरोपावरून वरणगाव येथील पत्रकार संघटना आक्रमक झाली असून, संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात आली आहे.



