Home आरोग्य आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७८ वर्षीय वृद्धाचे...

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७८ वर्षीय वृद्धाचे यशस्वी शस्त्रक्रियेने वाचले प्राण

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तीव्र पोटदुखी, पोट फुगणे आणि अनेक दिवस शौचास न होण्यासारख्या गंभीर त्रासाने त्रस्त असलेल्या ७८ वर्षीय वृद्धावर वेळीच निदान करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मोठ्या आतड्याला बसलेला जीवघेणा पीळ (सिग्मॉइड व्हाल्वुलस) वेळेत ओळखून शल्यचिकित्सकांनी केलेल्या तत्पर उपचारामुळे रुग्णाला नवजीवन मिळाले आहे.

मलकापूर येथील लक्ष्मण पाटील (वय ७८) यांना काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. कालांतराने त्यांचे पोट मोठ्या प्रमाणात फुगले आणि शौचास होणे पूर्णपणे बंद झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी रुग्णाच्या लक्षणांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर तातडीने सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या आतड्याच्या सिग्मॉइड भागाला पीळ बसल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ‘सिग्मॉइड व्हाल्वुलस’ असे म्हटले जाते. सिग्मॉइड व्हाल्वुलस या आजारात आतडे स्वतःभोवती वळल्यामुळे अन्न, वायू आणि मल जाण्याचा मार्ग बंद होतो. वेळेवर उपचार न झाल्यास आतड्याचा रक्तपुरवठा थांबून आतडे निकामी होण्याचा तसेच रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांच्यासह डॉ. प्रज्योत कदम आणि डॉ. आदित्य पाटील यांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान आतड्याला बसलेला पीळ यशस्वीरीत्या सोडविण्यात आला. तसेच आतड्याची स्थिती तपासून आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर लक्ष्मण पाटील यांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा झाली असून, सध्या ते धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वेळेत रुग्णालयात दाखल होणे आणि अचूक निदान झाल्यामुळे मोठा धोका टळला आहे.

याबाबत डॉ. प्रज्योत कदम यांनी सांगितले की, “सिग्मॉइड व्हाल्वुलस ही विशेषतः वृद्धांमध्ये आढळणारी गंभीर समस्या आहे. पोटदुखी, पोट फुगणे, उलट्या होणे किंवा शौचास न होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. वेळेत सीटी स्कॅनसारख्या तपासण्या केल्यास अचूक निदान होते आणि योग्य उपचारांमुळे जीवितहानी टाळता येते. या रुग्णाच्या बाबतीतही वेळीच निदान झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले.” डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्पर निर्णयामुळे आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे ७८ वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार होऊन त्यांना जीवदान मिळाले आहे.


Protected Content

Play sound