Home Cities अमळनेर अमळनेर उपजिल्हा रुग्णालयाला मोठी भरारी ; 20 अतिरिक्त पदांना मंजुरी 

अमळनेर उपजिल्हा रुग्णालयाला मोठी भरारी ; 20 अतिरिक्त पदांना मंजुरी 

0
13


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 20 अतिरिक्त पदांना मंजुरी दिली असून, यामुळे येथील आरोग्य सेवेत मोठी वाढ होणार आहे. या निर्णयामुळे रुग्णांना अधिक तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार असून परिसरातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार आहे.

माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाचा यासंदर्भातील आदेश 24 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील काही निवडक आणि 50 टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांसाठी ही पदनिर्मिती करण्यात आली असून, अमळनेर उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश त्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पदवाढीसाठी गेल्या 24 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर त्याचे बांधकाम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असून, त्यामुळे प्रशासनाने आवश्यक मनुष्यबळ वाढीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाची क्षमता आणि सेवा देण्याची गती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

पूर्वी या रुग्णालयात एकूण 29 पदे कार्यरत होती, ज्यामध्ये वर्ग-1 वैद्यकीय अधीक्षक, वर्ग-2 वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश होता. आता मंजूर झालेल्या 20 नव्या पदांमध्ये 4 तज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल. यामध्ये 1 सर्जन, 1 फिजिशियन आणि 2 एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश असून, तसेच नर्सिंग आणि इतर सहाय्यक कर्मचारी देखील वाढवले जाणार आहेत. याशिवाय एनएचएम अंतर्गत 20 कंत्राटी कर्मचारी आधीपासून कार्यरत असल्याने आता मोठी वैद्यकीय टीम अमळनेर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत राहणार आहे. यामुळे आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया आणि सर्वसाधारण उपचार यामध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.

आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाचे उपजिल्हा दर्जात रूपांतर, बांधकामाची प्रगती आणि आता पदवाढ या सर्व प्रक्रियेत त्यांच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे आणि संपूर्ण स्टाफचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले आहेत. या निर्णयामुळे अमळनेर परिसरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, जलद आणि तज्ञ डॉक्टरांच्या सेवांनी परिपूर्ण होणार आहे.


Protected Content

Play sound