
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या चक्रीवादळ, अतिवेगवान वारे आणि गारपिटीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाईचे दावे नाकारले जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देत AIC पिक विमा कंपनीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अंतुर्ली परिसरात 31 मे ते 6 जून 2026 या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो हेक्टरवरील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे डॉ. सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
या नुकसानीची स्थानिक लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले आहेत. मात्र, AIC पिक विमा कंपनीने नायगाव येथील हवामान केंद्राच्या नोंदींचा आधार घेत अनेक शेतकऱ्यांचे विमा दावे नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“शेतात प्रत्यक्ष नुकसान झालेले दिसत आहे, प्रशासनाने पंचनामे केले आहेत आणि लोकप्रतिनिधींनीही पाहणी केली आहे. तरीही विमा कंपनी नुकसान झाले नसल्याचे सांगत असेल तर हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. विम्याच्या नावाखाली प्रीमियम घेऊन नुकसानाच्या वेळी दावे नाकारणे म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक आहे,” अशी टीका डॉ. विवेक सोनवणे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नाकारण्यात आलेले सर्व विमा दावे तातडीने मंजूर करावेत, AIC कंपनीच्या निर्णय प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, महसूल विभागाच्या पंचनाम्यांना ग्राह्य धरावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर केळी उत्पादकांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. या प्रकरणामुळे पिक विमा योजनेच्या कार्यपद्धतीवर आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संरक्षणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



