
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेची व्याप्ती वाढवणे आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज रस्ता सुरक्षा प्रशिक्षण या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन आणि आयआयटी मद्रासच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शना नुसार हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रशिक्षण सत्रात डॉ.रोशन जोश, मुख्य प्रकल्प अधिकारी प्रदीप कुमार यांनी मार्गदर्शन केले. रस्ते सुरक्षेसंदर्भातील माहिती ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदविण्याची प्रक्रिया, अपघातप्रवण क्षेत्रांची ओळख पटविणे, त्यांचे नियमित सर्वेक्षण करणे आणि त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना राबविणे याबाबत उपस्थितांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.
तसेच रस्ते अपघात घडलेल्या किंवा अपघातप्रवण भागाजवळ उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आणि आपत्कालीन साधनसामग्रीची उपलब्धता यांचे मूल्यमापन कसे करावे, याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अपघातानंतर तातडीने मदत पोहोचविण्यासाठी विविध विभागांमधील समन्वयाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण प्रास्ताविकात मार्गदर्शन करताना म्हणाल्या,या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करावयात याबाबत काय खबरदारी घेणे आवश्यक आहे या बाबत संपूर्ण माहिती या प्रशिक्षणातून दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा जेणेकरून जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होऊन जीवितहानी टाळता येईल असे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर डी पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड, नायब तहसिलदार रवींद्र उगले, यांच्यासह पोलीस, परिवहन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, महानगरपालिका, नगरपालिका विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षेसंदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान, माहिती व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रभावी वापर करून जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रशिक्षणाच्या शेवटी कार्यकारी अभियंता आर डी पाटील यांनी आभार व्यक्त केले.



