Home Cities जळगाव विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन ; ३० जून अंतिम...

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन ; ३० जून अंतिम मुदत

0
19


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र व राज्य शासनाच्या विविध सामाजिक सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव शहरातील संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांच्या लाभार्थ्यांपैकी अद्याप केवळ ४० टक्के लाभार्थ्यांनीच हयातीचे दाखले जमा केले असल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा लाभार्थ्यांना सूचना दिल्या आहेत.

 केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशासनाकडून याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे लाभार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, संजय गांधी योजना, नगरपालिका क्षेत्र जळगाव शहर अंतर्गत लाभ घेणाऱ्या एकूण लाभार्थ्यांपैकी अद्यापपर्यंत केवळ ४० टक्के लाभार्थ्यांनीच हयातीचे दाखले सादर केले आहेत.

त्यामुळे संबंधित सर्व लाभार्थ्यांनी तातडीने हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना स्वतःच्या मोबाईलमध्ये सत्यापन अॅप उपलब्ध असल्यास त्याद्वारे किंवा नातेवाईकांच्या मदतीने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करता येणार आहे. याशिवाय संजय गांधी योजना कार्यालय, नगरपालिका क्षेत्र जळगाव शहर, रेल्वे स्टेशन रोड येथील ग्राम महसूल अधिकारी, कार्यालयातील संगणक परिचालक कर्मचारी तसेच जवळील आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातूनही हयातीचा दाखला ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून जमा करता येणार आहे. लाभार्थ्यांनी प्राप्त केलेले हयातीचे प्रमाणपत्र दि. ३० जून २०२६ पर्यंत संजय गांधी योजना कार्यालय, नगरपालिका क्षेत्र जळगाव शहर, रेल्वे स्टेशन रोड येथे जमा करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound