Home Cities जळगाव लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन ; २५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन ; २५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या लिपिक वर्गीय गट ‘क’ कर्मचाऱ्यांसाठी लेखा, वित्त आणि संगणक प्रणालीविषयक ज्ञानवृद्धीसाठी महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा कालावधी दि. १ जुलै २०२६ ते दि. १० सप्टेंबर २०२६ असा असून एकूण ५० दिवसांचे हे प्रशिक्षण सत्र असणार आहे. प्रशिक्षणामध्ये शासकीय लेखा पद्धती, वित्तीय व्यवहार, कार्यालयीन कामकाजाशी संबंधित विविध बाबी तसेच शासनाच्या विविध संगणक प्रणालींची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा निश्चित व सविस्तर अभ्यासक्रम जिल्हा कोषागार कार्यालय, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक शासकीय कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेता येणार असून, प्रशिक्षणासाठीचे आवेदन पत्र आणि शिफारस पत्र दि. २५ जून २०२६ पर्यंत लेखा व कोषागारे कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. सर्व शासकीय कार्यालयांमधील इच्छुक तसेच नव्याने नियुक्त झालेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना या ५० दिवसांच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी सहभागी होता येणार आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी विशिष्ट मॉड्युलनिहाय प्रवेशाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनस्त लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन लेखा व कोषागारे, नाशिक विभागाचे सहसंचालक बाबुलाल द. पाटील यांनी केले आहे. या प्रशिक्षणामुळे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना लेखा व वित्तीय कामकाजातील कौशल्य विकसित करण्यास मदत होणार असून, शासकीय कार्यालयातील आर्थिक व्यवहार अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने हाताळण्यास सहाय्य होणार आहे.


Protected Content

Play sound