Home आरोग्य जळगावात सामूहिक योगाभ्यास ; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत योगसाधनेचा संदेश

जळगावात सामूहिक योगाभ्यास ; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत योगसाधनेचा संदेश

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आणि निरोगी जीवनशैलीचा प्रभावी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच ‘मेरा युवा भारत, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, ‘मेरा युवा भारत’चे युवा अधिकारी अभिषेक चवरे, गट शिक्षणाधिकारी (पाचोरा) विजय पवार, मनपा प्रशासनाधिकारी खलील शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, योग प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा योग प्रशिक्षक चंचल माळी यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितांनी विविध योगासने, प्राणायाम आणि योगसाधना केली. योगामुळे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तसेच दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब केल्यास आरोग्यदायी जीवनशैली निर्माण होते, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

या सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमात जिल्हा खो-खो संघटनेचे शेखर पोळ आपल्या खेळाडूंसह, खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटरचे खेळाडू व प्रशिक्षक निलेश बाविस्कर, प्रगती शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. शिरसाट व विद्यार्थी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व क्रीडा शिक्षक रंजीत पाटील तसेच विविध विद्यालयांतील खेळाडू आणि महिला क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. योग दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत आरोग्य, शिस्त आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. योग हा केवळ व्यायाम प्रकार नसून शरीर आणि मन यांच्यात समतोल साधणारी जीवनपद्धती असल्याचे यावेळी उपस्थितांनी अधोरेखित केले.

योगाभ्यास कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा, विविध क्रीडा उपक्रम आणि सेवांचा आढावा घेतला. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक सुधारणा आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांना दिल्या. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यात योगाबाबत जनजागृती वाढण्यास मदत झाली असून, निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला. सामूहिक योगसाधनेतून आरोग्यदायी समाजनिर्मितीचा संकल्प यावेळी करण्यात आला.


Protected Content

Play sound