Home Cities जळगाव पोलीस बॉईज असोसिएशनच्या लढ्याला मोठे यश ; महाराष्ट्र पोलिसांच्या DG लोनसाठी कर्मचाऱ्यांची...

पोलीस बॉईज असोसिएशनच्या लढ्याला मोठे यश ; महाराष्ट्र पोलिसांच्या DG लोनसाठी कर्मचाऱ्यांची यादी जाहीर

0
56

यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या DG लोन (गृहकर्ज अग्रिम) प्रकरणाला अखेर मार्ग मिळाला आहे. पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, पोलीस महासंचालक कार्यालयाने DG लोन मंजुरीसाठी पात्र असलेल्या ५ हजार ४५९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. येत्या काही दिवसांत संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याने राज्य पोलीस दलात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सन २०२३ पासून प्रलंबित असलेल्या DG लोनला मंजुरी मिळावी, यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून प्रमोद वाघमारे यांनी गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर १७६८.०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून १९ जून २०२६ रोजी लाभार्थी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य पोलीस दलातील सुमारे पाच हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घर बांधण्यासाठी DG लोन मिळावे यासाठी सन २०२३ मध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाकडे अर्ज दाखल केले होते. मात्र विविध कारणांमुळे ही प्रक्रिया तब्बल अडीच वर्षे रखडली होती. लोन मंजूर होत नसल्याने अनेक पोलीस कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले होते. काही कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा व्यक्त करत न्याय मिळवून देण्याची विनंती पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्याकडे केली होती.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रमोद वाघमारे आणि संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी राज्यभरातून जिल्हाधिकारी, आमदार, पालकमंत्री यांच्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदने सादर केली. तसेच डिसेंबर २०२५ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर भव्य मोर्चा काढून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले होते. या सातत्यपूर्ण आंदोलन आणि पाठपुराव्यानंतर अखेर DG लोनची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पोलीस महासंचालक कार्यालयाने लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

DG लोनचा प्रश्न मार्गी लागल्याने राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रमोद वाघमारे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, अनेकांनी वैयक्तिक संपर्क साधून त्यांचे आभार मानले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी केलेल्या या लढ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जळगाव जिल्हा पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भूषण नगरे, उपाध्यक्ष हेमंत तावडे तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटना यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound