
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत भुसावळ रेल्वे विभागात २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भुसावळ येथील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक योग सत्राला रेल्वे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशवासियांना मार्गदर्शन केले. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “निरोगी आणि सुदृढ वृद्धत्वासाठी योग” अशी असून, वाढत्या वयातही शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमास भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनीत अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी, रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांनी उत्साहाने योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संकल्प केला.
प्रसिद्ध योग प्रशिक्षिका सौ. संध्या सोनी आणि श्री. धीरेंद्र कुमार सोनी यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच प्रत्येक योग प्रकाराचे आरोग्यविषयक फायदे समजावून सांगितले. योग हा केवळ व्यायाम नसून तणावमुक्त जीवन, मानसिक संतुलन आणि अंतःशांती मिळवून देणारी जीवनशैली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने झाली. त्यानंतर उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्राणायाम, विविध योगासने आणि ध्यानाचा अभ्यास केला. योग सत्राच्या समारोपानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सामूहिक योगाभ्यासामुळे क्रीडांगण परिसरात एकात्मता, सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “नियमित योग करा, निरोगी जीवन जगा” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मुख्य कार्यक्रमासोबतच भुसावळ रेल्वे विभागातील विविध डेपो, कार्यालये आणि कार्यशाळांमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक माध्यमांच्या विविध माध्यमांतून योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत जनजागृती करण्यात आली.



