
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील पी. एन. गाडगीळ अँड सन्स (PNG) कलादालनात होतकरू विद्यार्थिनी अनुष्का शिंपी हिच्या ‘बेयॉन्ड बाउंड्रीज’ (Beyond Boundaries) या आगळ्यावेगळ्या चित्र प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. चारकोल या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध खेळाडूंची हुबेहूब व्यक्तिचित्रे साकारत अनुष्काने आपल्या कलागुणांची अनोखी झलक या प्रदर्शनातून सादर केली आहे.

या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन अथांग जैन, स्टेट बँकेचे असिस्टंट मॅनेजर धर्मेंद्र कुमार सिंग, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील आणि पी. एन. गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक गिरीश ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनुष्काच्या कलाकृतींचे बारकाईने निरीक्षण करत तिच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले.
अनुष्काने चारकोल माध्यमाचा प्रभावी वापर करत भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंची भावमुद्रा, व्यक्तिमत्त्व आणि खेळातील ऊर्जा आपल्या चित्रांमधून जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या कलाकृतींमधून चित्रकलेतील बारकावे, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलतेची प्रचिती येते. या चित्रांना आकार देण्यासाठी तिला तरुण भाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. ‘बेयॉन्ड बाउंड्रीज’ हे प्रदर्शन क्रिकेटप्रेमी तसेच कला रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. खेळ आणि कला यांचा सुंदर संगम या प्रदर्शनातून पाहायला मिळत असून, अनुष्काच्या कलाप्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे प्रदर्शन १८ जून ते २२ जून या कालावधीत पी. एन. गाडगीळ अँड सन्स कलादालनात सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. जळगावकरांना एका युवा कलाकाराच्या कल्पकतेचा अनुभव घेण्याची ही विशेष संधी उपलब्ध झाली आहे. अनुष्का शिंपी हिच्या ‘बेयॉन्ड बाउंड्रीज’ चित्र प्रदर्शनाने जळगावच्या कला क्षेत्रात नवा उत्साह निर्माण केला असून, चारकोलच्या माध्यमातून साकारलेल्या क्रिकेटपटूंच्या व्यक्तिचित्रांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.



